Wednesday, February 27, 2019

संघर्ष-दिग्नेश मते

“संघर्ष” हे प्रा. शिवाजीराव भोर यांचे आत्मकथन आहे.

त्यांना लहानपणापासून जे चांगले-वाईट अनुभव आले, माणसे भेटली, त्याच्या स्वभावगुणाचा उहापोह त्या त्या वळणावर मांडताना त्यांना कधी आनंद झाला. कटू आठवणी रेखाटताना वेदनांनी अंतःकरण विदीर्णही झाले. कदाचित त्या प्रसंगांनीच त्यांना आत्मकथन लिहायला प्रवृत्त केले असावे. वेदनेला वाचा फुटणे हा तर खरा साहित्याचा गुणधर्म असतो. वेदनांना वाट करून देणे व वेदनांचा परिहार करून मनात दाटलेल्या भावनांना मोकळे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या आत्मकथनातून झालेला आहे.

लेखकाचे बालपण अमळनेरचे. त्या कालावधीत त्यांना लाभलेल्या चांगल्या शिक्षकांमुळे त्यांच्या जीवनाची जडणघडण उत्तम प्रकारे झाली. गावातील वाटचाल म्हणजे सातवीची परीक्षा देऊन अकरावीची परीक्षा दिली. शेवटचा पेपर देऊन घरी येत असताना चार आण्याची भाजी कागदात आणली. त्या कागदावर एक निवेदन होते. त्या निवेदनाच्यावर एका दाढी असलेल्या व्यक्तीचा फोटो व जवळच ‘कमवा आणि शिका’ असे छापले होते.

लेखकाने एक कार्ड घेतले व निवेदनातील पत्त्यावर पत्र पाठवले. एक महिन्याने पत्राचे उत्तर आले. त्यात असाल तसे या, तुमच्या शिक्षणास मदत करण्यात येईल. खाली सही होती, प्राचार्य एस. के. उनउने यांची. हाच क्षण लेखकाच्या आयुष्याला मोठा कलाटणी देणारा ठरला. साताऱ्याला शिकायला जायची संधी मिळाली. कठीण परिस्थितीत अकरावीची पुस्तके विकून खर्चापुरते पैसे जमा करून साताऱ्याला शिक्षणाची संधी प्राप्त झाली आणि हेच रयत शिक्षण संस्थेतले त्यांचे पदार्पण ते खऱ्या अर्थाने अनेक पदांपर्यंत पोहोचण्यास लेखकाला फलदायी ठरले.

१९३८ ते २०१२ हा प्राचार्यांच्या अमृतमहोत्सवी जीवनाच्या वाटचालीचा आलेख अतिशय समृद्धपणे आणि सडेतोडपणे लेखनातून उमटलेला आहे. सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज हा सरांच्या जीवनाचा आत्मा होता. तेथे त्यांना काम करण्याची संधी मिळाली. १९७३ नंतर सरांच्या जीवनाचा उत्कर्षकाळ आला. रयत संस्थेत त्यांनी त्यांच्या कर्तबगारीचा ठसा उमटवला. कर्जत, विटा, कोपरगाव, श्रीरामपूर या ठिकाणी प्राचार्य पद भूषवले. पुणे विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य व डीन म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली.

१९९३ मध्ये त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदाची संधी मिळाली. त्यांच्या सचिवपदाच्या कार्यकाळात रयतला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार व दलितमित्र पुरस्कार मिळाला. ‘संघर्ष’ हे पुस्तक मी वाचले, त्यातील बारकावे, मनाला चटका लावणारे अनेक प्रसंग विचार करण्याजोगे वाटले व सामाजिक जाणिवांचे भान ठेवून आपले कर्तव्य कसे पार पाडावे हे समजले.

दिग्नेश दत्ता मते
तुकडी – ब इयत्ता – ९ वी
तालुका – कर्जत,  जिल्हा – रायगड
शाळेचे नाव – विद्याविकास मंदिर, नेरळ

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीदिन

1 comment:

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...