Monday, February 25, 2019

काळेपाणी-सई जोशी

पुस्तक परीक्षण-काळे पाणी
लेखक विनायक दामोदर सावरकर

एक मुलगी, मालती...... या रूपवती कन्यकेचे आयुष्य हे मानवी सहनशक्तीच्या पलिकडचे आहे. आयुष्यातील एक छोटी घटना अखखा जीवनपट कशी बदलू शकते हे  या पुस्तकात असले तरी लक्ष केंद्रीत केले आहे ते अंदमानच्या बंदिगृहातील.

ब्रिटिश राज्यकर्त्यांनी १७ एप्रिल १९३४ रोजी माझी जमठेप या पुस्तकावर बंदी घातली. अशावेळी अंदमानाच्या कारागृहातील अत्यंत कष्टकारक, तापदायक आणि अमानुष  जीवन कसे जगावे लागते हे आपल्यापर्यंत पोहोचावे म्हणून ‘काळे पाणी' हे कथानक लिहिले.

तुरूंगा-तुरूंगातून साचलेले काळया पाण्याचे दंडित एकत्र करून अंदमानला धाडण्यात येतात, त्यालाच अंदमानचे चलान असे म्हणतात. त्या प्रत्येक काळया पाण्यावर जाणाऱ्या दंडिताच्या पायात ठोकलेल्या आणि वर कटिला बांधलेल्या खणखण करणाऱ्या २-३ लोखंडी खेड्या, छातीवर एकेक बिल्ला व त्यावर शिक्षेची वर्षे यावर नाव कोरलेले, प्रत्येकाच्या काखेत त्याच्या अंथरूणाची अळकुटी आणि एका हातात थालीपाट घेऊन त्या ओझ्याने वाकलेला बंदिवान अंदमानला जाणार असतो. हे सावरकरांनी अगदी जिवंत केले आहे.

याची भयानकता आपल्याला तेव्हा जाणवते जेव्हा सावरकर म्हणतात, महाराजा जलयानाने हया धक्क्यावरून उचलून सगळ्य  अपराध्यांना काळया पाण्यावर नेऊन सोडले असेल पण त्यातील एकाला देखिल परत धक्क्यावर आणून सोडले नसेल, हया जगाला तो मेला आणि हे जग त्याला मेले!”

ही वाक्य जेव्हा डोळ्याखालून जातात तेव्हा अंदमान हे जिवंतपणे गाडले जाण्याचे थडगे वाटू लागते.
काळे पाणी या कादंबरीचे कथानक काल्पनिक नाही. अफिउद्दीन, योगानंद, मालती आदि नावे काल्पनिक असली तरी हे पुस्तक एका बंदीवनाच्या न्यायालयातील अभियोगावर आधारलेले आहे.

पुस्तक वाचायला लागल्यावर सावरकरांची गंगासागराप्रमाणे उफाळून आलेली लेखणी याचकाची चीड चेतवणारी आहे. अत्याचाराच्या बेडया तोडून या अमानवी कृतघ्नतेचे वर्णन हे या पुस्तकात आपल्याला दिसते.
या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मंदिगृहात कोंडलेले सावरकर आपल्याला दिसतात. त्या मातृभूमीच्या चेहऱ्यावरचे तेज हे आपल्याला भूलवण दिल्याशिवाय वाहत नाही. या पुस्तकातून इतकी ऊर्जानिर्मिती आणि विचारमंथन चालू होते की २८८ पानं कधी संपतात हे सुध्दा कळत नाही.

सावरकरांनी अशी कादंबरी लिहीण्यामागचे कारण म्हणजे याच्या सुरुवातीला अथवा शेवटी, कुठेही अंदमान आणि काळयापाण्याचा उल्लेख नसल्याने इंग्रजांना हयाच्यावर बंदी घालणे अवघड होते. हे पुस्तक गोष्टीरूप असल्यामुळे कुठेही कंटाळा येत नाही आणि तेव्हाची परिस्थितीही उलगडत जाते.
तर अशा अनेक ज्ञात अज्ञात बंदीनी सहन केलेल्या यातनांचा जाणीवपूर्वक अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त कवण्यासाठी हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे.

-सई वैभव जोशी
८वी
ज्ञानप्रबोधिनी प्रशाला

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन

No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...