‘प्रज्वलित मने’
हे एक अत्यंत प्रेरणादायी पुस्तक आहे. याचे मूळ लेखक डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम हे आहेत. याचे अनुवादक चंद्रशेखर मुरगुडकर हे आहेत.अनुवाद करताना पुस्तकाच्या मूळ साच्याला धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली दिसून येते. एकूण १४४ पानांच्या या पुस्तकात भारतातील अनेक भागातील विद्यार्थी,नागरिक,संत, तरुण, वैज्ञानिक यांच्या अंतरंगातील देशप्रेम व्यक्त करण्यात आले आहे. मी वाचलेले पुस्तक हे ६ वी आवृत्ती असून ते २००५ मध्ये चिनार पब्लिशर्स सौ. सुषमा नहार यांनी प्रकाशित केले आहे. याची किंमत १५०रु आहे.
पुस्तकाच्या अगदी मुखपृष्ठावरच एक चिकित्सक चेहरा छापला आहे. यातून भविष्याचा वेध घेणारी दृष्टी दिसून येते. या मुखपृष्ठावरची संकल्पना चंद्रमोहन कुलकर्णी यांची आहे. या पुस्तकामधून भारतातील सुप्त शक्तीच्या मुक्ततेचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीला एक आदर्श सुविचार दिला आहे. त्यांपैकी मला एफ. मेक्समुलर यांचा भारताबद्दलचा सुविचार अत्यंत भावला. अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न व त्याचे चिकित्सकपणे दिलेले उत्तर याचे अनेक नमुने कलामांनी नमूद केले आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक पाठाच्या शेवटी त्याचा सारांश नेमक्या शब्दात दिला आहे. स्वप्न व संदेश या पाठात डॉ.अब्दुल कलाम यांनी गतकालीन पाच आदर्श व्यक्तींच्या संवादाची कल्पना केलेली आहे. ते पाच आदर्श व्यक्ती म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी, अल्बर्ट आईन्स्टाईन, सम्राट अशोक, अब्राहम लिंकन, खलीफ ओमर हे होय. या मध्ये त्यांनी आपल्या भारतवर्षाबद्दल व्यक्त केलेले आपले विचार अत्यंत महान व प्रेरणादायी आहेत.
देशाची नव्याने बांधणी करताना स्वप्न आणि संदेश, आदर्शांचा शोध, संत महंतांची शिकवण यांचा तर उहापोह केला आहे पण राजकारण आणि समीकरण यांच्या पलीकडची राष्ट्रभक्तीही अधोरेखित केली आहे. सर्व शक्तींचा समन्वय साधताना ज्ञानधिष्ठित समाज ही किती महात्वाचा आहे हे समजावून सांगितले आहे. स्नेहल ठक्कर या मुलीच्या उत्तरावर विचार करणे किती क्रमप्राप्त आहे हे पटले म्हणून कलामांनी हे पुस्तक तिला अर्पण केले आहे. या पुस्तकाच्या शेवटी एक तारुण्य गीत दिले आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर डॉ. कलामांची हसतमुख छबी आत्माविश्वासाची हमी देते. चिनार पब्लीशर्स चे प्रतिक असलेले वृक्ष बहरत येणाऱ्या व विकसित होणाऱ्या लोकाशाहीचे प्रतिक वाटते. हे पुस्तक वाचल्यानंतर डॉ. अब्दुल कलाम हे भारताला लाभलेले एक अष्टपैलू वैज्ञानिक व्यक्तीमत्व होते याची प्रचीती येते. ज्या तरुणांना आपल्या आदर्शांच्या तर्काधिष्ठित पाऊलावर पाउल ठेवून आपले सोनेरी आयुष्य जगायचे असेल तर त्यांनी हे स्फूर्तीदायक पुस्तक वाचलेच पाहिजे.
ऋचा रवींद्र पाटील
इ. ९ वी ब
एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज, बाहुबली.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment