काळजाला हात घालणारी
'नॉट विदाऊट माय डॉटर' हि मेहता प्रकाशनाद्वारे प्रकाशित केलेली सुंदर कादंबरी एका भयानक सत्यघटनेवर आधारित आहे. बेट्टी महमूदी यांच्या जीवनाभोवती या कादंबरीचे कथानक फिरते. स्वतः बेट्टी यांनी सहलेखक विल्यम हॉफर यांच्यासह आपल्या जीवनातील थरार शब्दबद्ध केला आहे.
अतिशय नेमक्या शब्दात मांडलेली हि चित्तथरारक कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते, त्यांच्या मनाचा ठाव घेते.
अमेरिकेत रहाणा-या बेट्टी महमूदी यांना इस्पितळात डॉ. सय्यद बोझोर्ग उर्फ मूडी नावाचा एक इराणी माणूस भेटतो, ते दोघे प्रेमात पडतात आणि लग्नही करतात. त्यांना एक मुलगीही होते. तिचं नाव माहतोब. माहतोब चार वर्षांची असताना मूडी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी म्हणून त्या दोघींना घेऊन इराणला जातो. कुराणावर हात ठेऊन शपथ घेत मूडी बेट्टीला वचन देतो की तुला कोणीही इराणमध्ये रहायची सक्ती करणार नाही. तुला हवे तेव्हा अमेरिकेला । परतण्यासाठी तू मोकळी असशील. तिचाही यावर विश्वास बसतो, पण पुढे वाढून ठेवलेल्या संकटांची तिला यत्किंचीतही कल्पना नसते. आणि मग सुरूवात होते बेट्टीच्या आयुष्यातील एका महाभयानक वादळाची. ज्यातून सुटका करुन घेणं, आणि तेही आपल्या मुलीसह...अशक्यप्राय असतं!
पुस्तकातील प्रसंग आणि त्यांचे वर्णन वाचून आपल्या अंगावर काटा येतो, घृणा वाटते अशा परंपरांबद्दल, जिथे स्त्रियांना कस्पटासमान वागणूक दिली जाते. बेट्टी मेहमूदी यांनी हे सर्व सहन केलं. पण जेव्हा सहनशक्तीचा अंत झाला तेव्हा त्यांनी एक निर्णय घेतला. स्वत:साठी आणि खास करून छोट्या माहतोब साठी. | मूळ भाषेत बेट्टीने आपले अनुभव ज्या ताकदीने मांडले आहेत त्याच ताकदीने लीना सोहनी यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. लेखिकेच्या ओघवत्या लेखन शैलीमुळे बेट्टीबाबत जेवढी सहानुभुती वाटते, दु:ख वाटते त्यापेक्षा जास्त तिच्या धाडसाचे कौतुक वाटते. संकटांना तोंड देत जगणाच्या अनेक महिलांना या कादंबरीने जगायची नवी उमेद मिळते, संकटातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळते. पुस्तक वाचता वाचता आपण तिच्या विश्वात कधी जातो, हे आपल्याला कळतही नाही.
मनस्वी पेंढारकर
इयत्ता-९वी
माधव सदाशिव गोळवलकर
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment