मला आवडलेले पुस्तक-श्यामची आई
मला आजूबाजूला जास्त मित्र, मैत्रिणी नसल्यामुळे, वाचन आणि एकांतात गाणे गुणगुणणे हे माझे आवडते छंद. त्यामुळे अभ्यासातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी हे छंद पुरेपूर जोपासते. माझ्या मते पुस्तके आपल्या जीवनात मनोचिकित्सकाचे काम करतात. त्यामुळे आपण रोजच्या व्यवहारात पण ह्या पुस्तकांप्रमाणेच वागत असतो. कुठेतरी त्यांचा पगडा आपल्यावर असतो.
मला वेगवेळ्या विषयाची पुस्तके वाचायला खूप आवडतात. त्यातील एखाद्या व्यक्तीचे आत्मचरित्र हा तर माझा आवडता विषय. अशाच एका आवडलेल्या पुस्तकाचे परीक्षण मी माझ्या शब्दात मांडत आहे. ते पुस्तक म्हणजे 'श्यामची आई'.
मराठी साहित्यातील 'श्यामची आई' हे साने गुरुजी लिखित पुस्तक म्हणजे त्यांनी साश्रू नयनांनी आईच्या प्रेमाला वाहिलेली श्रद्धांजली आहे. या पुस्तकात त्यांनी आईबद्दल असलेले प्रेम, भक्ति, कृतज्ञता व जिव्हाळा याचे उदात्त वर्णन केलेले आहे. आई-मुलाच्या या नात्याला उजाळा देणा-या या पुस्तकातील कोणतेही पान वाचताना मी माझे अश्रू थांबवू शकलेले नाही.
खरं तर या पुस्तकात कोणतेही उपदेशाचे डोस साने गुरुजींनी पाजलेले नाहीत, परंतु प्रत्येक प्रसंगात, जीवनात प्रेमाने कसे वागावे याचा प्रत्यय आपल्याला येत राहतो. भूतदया, मांजरीचं प्रेम, म्हातारीची गोळी, श्यामचे पोहणे, बंधुप्रेमाची शिकवण, सांबसदाशिव, पाऊस पडू दे, आईचा शेवटचा आजार, सात्त्विक प्रेमाची भूक अशा छोटय़ा छोटय़ा कथांमध्ये सर्वसामान्य घरातले प्रसंगच वर्णिले आहेत. परंतु त्याकडे पहायची सात्त्विक दृष्टी आणि खोटेपणा नसलेलं निर्मळ मन यामुळे ते प्रसंग आपल्या मनात ठसतात. ते प्रसंग आपण विसरूच शकत नाही.
‘श्यामच्या आईतील श्याम हा आपल्यासारखा सर्वसामान्य मुलगा, पण आईच्या प्रेमळ वात्सल्यतेने न्हाऊन निघाला. श्यामच्या आईने त्याला प्राणिमात्रांवर, झाडाझुडुपांवर प्रेम करायला शिकविले, कोंडय़ाचा मांडा करून खायला शिकविले, गरिबीतही खचून न जाता आलेल्या परिस्थितीत स्वत्व आणि सत्त्व न गमविता राहायला शिकविले. यातील 'श्यामचे पोहणे' या कथेमध्ये श्यामची आई, आपल्या मुलाला कोणी भित्रा म्हणून नावे ठेऊ नये म्हणून मारत मारत विहिरीकडे आणते व पोहणे शिकायला भाग पाडते. या प्रसंगातून, जी आई आपल्या मुलांना प्रेमाने ओंजारते गोंजारते, तीच आई वेळेप्रसंगी त्यांना चांगले वळण लागावे यासाठी त्यांच्या चुकांवर पांघरूण न घालता फटकावू देखील शकते हे पहायला मिळते यातून आईचे प्रेम आंधळे नसून ते आपल्या मुलांना योग्य दिशाच दाखवत असते याची प्रचिती येते.
पण आजकालच्या तरुण पिढीवर पाश्चात्य संस्कृतीचा एवढा प्रभाव आहे कि ते आपल्या आईवडिलांनी दिलेले संस्कार विसरून, स्वतःच्या सुखासाठी त्यांना क्षणोक्षणी दुःख देत आहेत. त्यांच्यातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी संपत चालली
आहे. त्यांच्यातील कृतज्ञतेची जागा आता कृतघ्नतेने घेतली आहे. खरं तर आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळावे म्हणून प्रत्येक आई वडील धडपडत असतात, परंतु कौटुंबिक आणि शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी आजकाल वडिलांबरोबर आईला देखील नोकरी करावी लागत आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांना पाहिजे तितका वेळ आणि योग्य संस्कार देऊ शकत नाही. साहजिकच मुले हेच प्रेम बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. आई वडिलांनी आपल्यासाठी केलेली तडजोड लक्षात न घेता त्यांच्यापासून दूर जातात. त्यामुळे या दोन पिढींमध्ये एक दरी निर्माण झाली आहे. त्यांच्यातील हि दरी जर मिटवायची असेल तर हे पुस्तक या दोन्ही पिढींनी नक्की वाचावे. हे पुस्तक त्यांचे मन नककीच बदलू शकेल.
माझी तुम्हा सर्वाना देखील हि विनंती आहे कि तुम्ही देखील 'श्यामची आई' हे पुस्तक नक्की वाचावे. माझी खात्री आहे कि, हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय नक्की भरून येईल व त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलून जाईल
रितिका रामानंद वराडकर
इयत्ता-८ वी
कोलंबा हायस्कूल, डॉ. काशीबाई नवरंगे मार्ग गावदेवी
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#मराठीभाषादिन
No comments:
Post a Comment