Monday, February 25, 2019

गुंफियेला शेला-सायली बेटकर

मला आवडलेले पुस्तक : गुंफियेला शेला

प्रा.शं.क. कापडणीस याचे ‘गुंफियेला शेला’ हे पुस्तक घरात आले. ‘गुंफियेला शेला’ हे पुस्तक म्हणजे शहरी व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा सुंदर संगम आहे.

सत्तावन्न लेख तसेच स्वानुभवाचा हा खजिना प्रत्येक मराठी वाचकाने वाचला पाहिजे. लेखकाने आपल्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे आयुष्य हा एक घाट आहे. तो चढताना दमछाक होते. पण घाटमाथ्यावर पोहोचल्यावर मिळणारा आनंद, सर्वांगीण शीतलता, सौंदर्याची मेजवानी हे सर्व अतिशय उत्साहवर्धक असते. हाच आनंद वाचक जसजसे हे पुस्तक वाचत जातो तसा जाणवतो.

या पुस्तकातील अहिराणी लोकगीतांमधील निंदनीय थट्टा या लेखात तर सबंध उत्तर महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या अहिराणी भाषेवर दृष्टिक्षेप टाकला आहे. दोन बायका करणार्‍या नवरोबाची फजिती कशी होते याचे वर्णन
पहिलीज व्हती मांगली काबर कयी
गादीना बसणार तुनी अक्कल कुठे गयी।।
एकनारीना पुरुष जेवणा दहीभात
दोन नारीना पुरुष त्यानी भांडत गयी रात।।

अशा शब्दांत केले आहे. पूर्वी दोन बायका केल्या जात. आता कायद्याने बंदी आली आहे. शिक्षणाचा नवा परिणाम समाजावर दिसतो आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लग्न न करतासुद्धा मूळच्या पत्नीचा दुस्वास करून बाहेरख्याली नवरे समाजात असतात. कोर्ट, पोलिस स्टेशन यांच्यामध्ये अशा भानगडीच्या तक्रारी पाहायला मिळतात.

जात्यावर दळणार्‍या स्त्रीला गाणं म्हणता आलं पाहिजे अशी अपेक्षा असते. पण जर का एखादीला गाणं म्हणता आलं नाही तर गाणं म्हणणारी स्त्री तिला दळताना गाण्यातून म्हणते,
जाताना आडे कोण बसना मुखजड 
नाव हिने ठेवा रानातली सौंदड।।
दळण मी सोवू अडसन फेकी देऊ
उडळ नारीनं दर्सन बाळी देऊ।।

अत्यंत कडक अशा शब्दात मुखजड, सौंदड (जंगलातील निरुपयोगी झाड) कानउघाडणी केली जाते. अशी अनेक अहिराणी गाणी, ओव्या यात समाविष्ट आहेत. मला लांडगा भेटला या लेखात तर लेखकाने लांडग्याने वाट अडवल्यावर आपली कशी फटफजिती झाली, याचा भूतकाळातील अनुभव अत्यंत विनोदी शैलीत मांडला आहे. कुणब्यांच्या शेतावर धाड, तुझी चंद्रभागा, मला चिंतामणी आणि गांधी भेटले, सणांची महाराणी दिवाळी, साहित्य आणि शिक्षण इत्यादी सर्वच लेखांसह पुस्तक वाचनीय आहे. विविधांगी सर्वस्पर्शी लेखनामुळे ‘गुंफियेला शेला’ हे पुस्तकाचे नाव समर्पक वाटते.

©सायली दिपक बेटकर
इयत्ता - १० वी

भैरव विद्यालय, घाटकोपर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#मराठीभाषादिन


No comments:

Post a Comment

काव्यलेखन भाग१

*नमस्कार,* *२७ फेब्रुवारी,मराठी भाषा दिन* हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी *कव...